Saturday, 7 October 2017

🌼🌼सप्तपदी भाग क्र.4 🌼

                🌼 सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन सप्तपदी या लेखमालेत हे चौथे पुष्प गुंफत आहे.या आधीच्या लेखांना आपण प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले आभार. अन्नदात्री, ऊर्जादात्री व धनदा हो या तीन पदांबद्दल या आधीच्या भागात आपण माहिती घेतली आहेच.त्याच सोबत विवाह संस्काराचे महत्व हि आपण वाचले आहे. आज आपण चौथ्या पदाबद्दल जाणुन घेवु. मायोभव्याय चतुष्पदी भव。असा मंत्र म्हणुन वराने वधुला चौथ्या तांदुऴाच्या राशीवर चालवावे. याचा अर्थ तु चार पावले माझ्या सोबत चाललीस तु मला   "भव्य करविणारी हो "किती उदात्त मागणी आहे पाहा. नवरा पत्नीला म्हणतोय तु मला  "भव्य " बनव. भव्य म्हणजे  बायकोने भरपेट जेवण घालुन जाडजुड धिप्पाड बनवणे असा अर्थ घेवु नये.हा विपर्यास होईल. शास्त्रकारांना अभिप्रेत आहे तो अर्थ फार मोठा व विस्तृत आहे. भव्य याचा अर्थ समजवुन घेताना पं.वाचस्पति मिश्रांचे उदारण समोर ठेवणे आवश्यक आहे. पं.वाचस्पति मिश्रा हे "अद्वैत तत्वज्ञान "या विषयावरचे फार मोठे अधिकारी दार्शनिक होते.त्यांचा विवाह "भामती " सोबत झाला (भामती हि देखील कुलशील संपन्न, विद्वान होती) पं.मिश्राजींच्या मनात आद्य शंकराचार्यांचे "ब्रह्मसूत्र " सारखे घोऴत होते.एवढे कठिण पण अद्वैताचे सर्वोच्च तत्वज्ञान भाष्य सर्वांना सहज सुलभ समजणार कसे याची चिंता त्यांचा मनात होती. विवाह झाल्या क्षणीच त्यांनी हया ब्रह्मसूत्रांवर टिका लिहायला आरंभ केला.काऴ लोटु लागला पं.मिश्राजींना अन्न पाण्याचे भान नव्हते.भामती मात्र कोणतिहि कटकट न करता शांतपणे पतीची सेवा करत होती. (भोजन व घरातली सर्व कामे) पंडितजींना आपल लग्न झालय हेहि भान नव्हत एवढे ते ध्यासमग्न होते. बरीच वर्षे लोटली व ग्रंथाचे हस्तलिखीत पूर्ण झाले तेव्हा समईच्या मंद प्रकाशात त्यांनी पाहिले एक स्त्री आपल्या शेजारी उभी आहे. पंडितजींनी विचारले "कोण आपण "काय हवय "?तेव्हा भामती म्हणाली महाराज मी आपली अर्धांगिनी. तेव्हा पं.मिश्रा भानावर आले त्यांनी हात जोडले  "मी एवढि वर्षे तुझ्याकडे लक्ष दिले नाहि मला क्षमा कर." तेव्हा भामती म्हणाली आपण जो ग्रंथ लिहिला तो समाजाला मार्गदर्शक ठरेल आद्य शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र अभ्यासताना आपला ग्रंथ सोबत घेवुनच तो अभ्यासला जाईल .यातच मला आनंद आहे. तिच्या या अतुलनीय त्यागामुऴेच "पं.वाचस्पति मिश्रा "हे "भव्य "झाले.व पंडितजींनी तिची स्मृति चिरंतन राहावी या करता या ग्रंथाचे नाव हि "भामती "ठेवले.आजहि वेदांत तत्वज्ञान, ब्रह्मसूत्र शिकणारे त्यावर (B.A., M.A. किंवा. P.H.D ) करणारे या "भामती "चा आधार घेतल्या शिवाय पुढे जावु शकत नाहित.किती त्याग आहे .पतीला "भव्य " बनवताना आपल्या "भौतिक "सुखांचा बऴी देणे हे असामान्य आहे.  आपण अनेक क्रांतिकारकांना वंदन करतो त्यांचे पूजन करतो पण त्यांचा या "भव्य "पणात त्यांचा पत्नींचा मोठा वाटा आहे हे मात्र विसरतो.जर या क्रांतिकारकांच्या बायकांनी  "पिक्चर, हॉटेल, शॉपिंग, दागिने, सणसमारंभ पार्टि "यांचे हट्ट केले असते तर आजहि आपण पारतंत्र्यात असतो हि विसरता नये . शांतिब्रह्म एकनाथ महाराज हे रोज अन्नछत्र चालवत अनेक लोक अतिथी भोजन करुन तृप्त होवुन जात असत.रोज लेखन प्रवचन कीर्तन हे नित्य घरी चालत असे  एकनाथ महाराज "भव्य "(श्रेष्ठ) झाले. त्यात त्यांचा पत्नीचाहि मोठा वाटा होता हे नाकारता येणार नाहि.त्या माऊलीने तेवढ्याच मायेने आपुलकीने हा सर्व प्रपंच केला म्हणुन हे शक्य झाले. या सर्व मातांचे "अलंकार "काय होते हे आपण जाणुन घेवु. हतस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणम्। श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणै: किं प्रयोजनम्।। भूषण म्हणजे अलंकार. (दानधर्म करणे हे हाताचे भूषण , सत्य बोलणे हे कंठाचे भूषण, चांगले ऐकणे हे कानांचे भूषण असताना बाकी अलंकारांचे काय प्रयोजन) या सर्व उदारणातुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ति म्हणजे एखादा पुरुष जेव्हा "भव्य "होतो तेव्हा त्याचा यशामागे त्याचा पत्नीचे अपार कष्ट असतात. "तुका आकाशा एवढा" हे म्हणताना "आवडाबाईंना "विसरुन चालणार नाहि.तुकोबा विठ्ठलभक्तित लीन असताना या मातेनेच प्रपंचाची जवाबदारी घेतली होती काश्यपस्मृतित स्पष्ट वचन दिलय "दाराधीना: क्रिया:सर्वा दारा:स्वर्गस्य साधनम् "  (दारा म्हणजे पत्नी.) पत्नी शिवाय केलेल्या सर्व क्रिया या विफऴ होतात. पत्नीच्याच सहकार्याने स्वर्ग प्राप्त होवु शकतो. "नास्ति भार्यासमं तीर्थम् "(पद्मपुराण भूमि。61-22) पद्मपुराणात तर "भार्येला "(पत्नीला) तीर्थ असे संबोधले आहे.तिची तुलना होवु शकत नाहि हेच सांगीतलय तेव्हा सर्व नवरोबांना हात जोडुन विनंती आहे कि आपण बाहेर कष्ट करुन पैसे मिऴवाल नाव पद प्रतिष्ठा (भव्यता)  मिऴवाल पण त्या सर्वांच्या मागे एक खंबीर शक्ति आहे त्यामुऴेच हे शक्य आहे.ती शक्ति म्हणजे "बायको "आहे. हे विसरु नका.ति खंबीर पणे घर सांभाऴते म्हणुनच आपण बाहेर पराक्रम गाजवु शकतो हे विसरु नये हि विनंती.तरच हे चौथे पाउल सार्थकी लागेल. तुर्त लेखन मर्यादा वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले 9404170656 (वरील लेख लेखकाच्या नावागावासहित अन्य समुहावर देवु शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाहि) 

No comments:

Post a Comment